वरई तृणधान्य पिक – माहिती

वरई तृणधान्य पिक

आपल्या राज्यात वरई हे पिक गवतवर्गीय कुळातील पीक आहे. या पिकाची लागवड प्रमुख्याने जास्त पाऊस पडणाऱ्या पश्चिम घाट विभाग, उप-पर्वतीय विभाग व कोकण विभाग या कृषी हवामान विभागातील डोंगराळ भागात केली जाते. वरी हे महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या पिकांपैकी महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. या भागातील आदिवासी व स्थानिक शेतकऱ्यांसाठी हे प्रमुख पौष्टिक तृणधान्य पीक आहे. हे पीक प्रामुख्याने उपवासाकरिता प्रमुख अन्न म्हणून खातात. वरईपासून   “भगर”   बनविली जाते. वरई हे पिक हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी खूप उपुक्त आहे.

वरई पिकाचे महत्त्व
  • वरईतील सर्व पौष्टिक घटकांचा विचार केल्यास रक्तातील कोलेस्टेरोल, शर्करा प्रमाण, पोटाचे व पचनाचे विकार कमी करण्यास मदत होते.
  • वरई मध्ये अॅण्टीऑक्स‍िडन्टचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे त्वचा, केस यांचे आरोग्य राखण्यास मदत होते.
  • वरई धान्याचा आहारात वापर केल्याने हृदयाशी निगडित व्याधी नियंत्रणात ठेवण्यासाठी लाभ होतो.
  • वरईत ग्लुटेन नसल्याने तसेच प्रथिने व तंतूमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने पचायला हलकी असते.
  • वरईत स्निग्ध पदार्थ, लोह जास्त प्रमाणात आढळतात म्हणूनच शरीरातील “हिमोग्लोबिनचे” प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
  • वरईत असलेल्या व्हिटॅमिन बी-3, सी, ए व इ जास्त प्रमाणात असतात.
  • वरईत पोटॅशियम, लोह, जस्त व कॅल्शियम हि खनिजे उपलब्ध असतात.
  • ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • शरीरात साठलेल्या चरबीचे प्रमाण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
वरई पिकांचे लागवडीच्या महत्त्व
  • वरई पिकाची हलक्या जमिनीत उत्तम वाढ होते आणि कमी पक्वता कालावधी असणारे हे पिक आहे. वाढीच्या काळात कमीत कमी निविष्ठा वापरून वाढ पूर्ण करतात.
  • वरई हे पिक सुधारित तंत्रज्ञानानुसार लागवड केल्यास उत्तम प्रतिसाद देणारी व अधिक उत्पादन देणारी पिके आहेत.
  • वरई पिकांपासून उत्तम प्रतीचे धान्य व जनावरांसाठी सकस चारा मिळतो.
  • वरई हे पिक उत्तम प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असल्याने आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर व भविष्यात मागणी वाढणारी पिके आहे.
  • बदलत्या हवामानात तग धरणारी पिके व तसेच आकस्मिक शेतीकरिता नियोजन केले जाऊ शकते.
वरईच धान्यचे  पौष्टिक गुणधर्म

जीवनसत्वे. :-

  • वरई धान्य नित्य सेवन करणाऱ्या लोकांमध्ये पचनाचे विकार, हृदयरोग आणि मधुमेहाचे प्रमाण कमी करता येऊ शकते.
  • वरई धान्यापासून भगर, डोसा, भाकरी, माल्ट, नूडल्स, पापड, आंबिल, इडली, बिस्क‍िटे यासारखे खाद्यपदार्थ तयार करता येतात.
  • वरई पिकांचे आणखी वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे या पिकांमध्ये मुबलक असलेले जीवनसत्वाचे प्रमाण. वरई धान्यामध्ये थायमिन बी-१ व फॉलिक असिड याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

प्रथिने व खनिज पदार्थ. :-

दैनंदिन मानवी आहाराच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्त्वाचे पौष्टिक तृणधान्य आहे.

  • वरई धान्यामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण भात आणि गहू धान्यापेक्षा जास्त असते.
  • वरई धान्यामध्ये पौष्टिक घटकांबरोबरच चांगल्या प्रतीचे पोषक तंतूमय पदार्थ असल्याने बद्धकोष्ठता होत नाही.
  • वरई धान्यामध्ये कॅल्शियम , मॅग्नेशियम व लोह या खनिजाचे प्रमाण अधिक आहे.
वरई पिकाची लागवड तंत्रज्ञान

जमीन व हवामान. :-

या पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन उत्तम आहे.

या पिकाची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील अतिपावसाच्या उप-पर्वतीय विभाग, पश्चिम घाट विभाग आणि कोकण विभागातील डोंगर उताराच्या जमिनीवर केली जाते. पूर्वी घेतलेल्या पिकाचे धसकटे, काडीकचरा व बहुवार्षिक गवताचे अवशेष वेचून शेत स्वच्छ करावे.

वरई पिकाची सुधारित जाती

कोकण सात्विक.

वरई पिकाचे हे वाण 115 ते 120 दिवसांमध्ये परिपक्व होते. याची उत्पादकाता हेक्टरी 18 ते 20 क्विंटल असते. हे मध्यम पक्वता व अधिक उत्पादकता देणारे पिक आहे.

फुले एकादशी. :-

वरई पिकाचे हे वाण 120 ते 130 दिवसांमध्ये परिपक्व होते. याची उत्पादकाता हेक्टरी 11 ते 12 क्विंटल असते.हे उशीरा पक्व होणारे व उंच वाढणारे वाण आहे.

वरई पिकाची बीज प्रक्रिया

बियाणे पेरणीपूर्वी   ‘अझोस्पिरिलम ब्रासिलेंस’   आणि   ‘अस्पर्जीलस अवामोरी’   या जिवाणू संवर्धकाची प्रति किलो बियाण्यास २५ गॅम प्रमाणे करावी.

वरई पिकाची पेरणीची पद्धत
  • वरई पिकाची पेरणी पावसाचे आगमन होताच अथवा पाण्याची सुविधा असल्यास जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी.
  • पिकाची लागवड मुख्यत्वे रोप लागण पद्धतीने केली जाते.
  • रोप लागण पद्धतीने लागवड करायची असल्यास ४ ते ५ किलो बियाणे/हेक्टरी वापरावे.
  • रोपवाटिका करताना गादीवाफे तयार करून त्यावर बियाणे ओळीमध्ये पेरून घ्यावे.
  • बियाणे १.०० ते १.५ से. मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाहीत याची काळजी घ्यावी म्हणजे उगवण चांगली होते.
  • वरई पिकाचा खरीप हा प्रमुख हंगाम आहे.
वरई पिकाची रोप लावणी पद्धत
  • गादी वाफ्यावर रोपे २० ते २५ दिवसांची झाल्यानंतर शेतामध्ये रोपांची पुनर्लागण करावी.
  • रोप लागण करताना दोन ओळीमधील अंतर ३०.० से.मी. (एक फूट) व दोन रोपामंधील अंतर १०.० से.मी. ठेवावे.
  • वरई पिकासाठी पिकासाठी रासायनिक खताची मात्रार
  • ४० किलो नत्र, २० किलो स्फूरद आणि २० किलो पालाश प्रति हेक्टर याप्रमाणे द्यावे.
  • अर्धे नत्र व संपूर्ण पालाश व संपूर्ण स्फुरद मात्रा पेरणी करताना द्यावी.
  • व उरलेले अर्धे नत्र पेरणी नंतर एक महिन्याने द्यावे.
  • वरई पिकाचे संद्रीय खत व्यवस्थापनर
  • पेरणीपूर्वी एक महिना अगोदर शेणखत अथवा कंपोष्ट खत ५ ते १० टन प्रति हेक्टर या प्रमाणे जमिनीत मिसळून द्यावे.
वरई पिकाची आंतरमशागत

वरई पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात पिकाची वाढ संथ गतीने होत असल्याने तणे पिकाशी स्पर्धा करतात. त्यामुळे तण नियंत्रणासाठी एक कोळपणी करुन गरजेनुसार एक महिन्याच्या आत एक खुरपणी करावी.

वरई पीक संरक्षण

खोडमाशी. :-

पेरणीनंतर पीक ६ आठवड्याचे असताना खोडमाशीचा प्रादुर्भाव सुरु होतो. या किडीच्या अळीद्वारे मुख्य खोडाचे नुकसान होऊन मर होते. त्यामुळे फुटव्यावर परिणाम होतो. सर्वाधिक नुकसान जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जाणवते.

उपाययोजना.- पावसाळा सुरु होताच ७ ते १० दिवसांच्या आत पेरणी करावी. तसेच पेरणीकरिता जास्त बियाणे वापरावे.

वरई पीक काढणी, मळणी व उत्पादन

पिकाच्या विविध वाणानुसार पक्वता कालावधी वेगळा असू शकतो. साधारणपणे १०० ते १२० दिवसांत पीक काढणीस सुरुवात करावी. काढणीस उशीर झाल्यास कणसातील/बोंडातील दाणे झडण्याची शक्यता असते. पिकाची काढणी करताना कणसे/बोंडे विळ्याने कापून करावी. दोन-तीन दिवस उन्हात चांगली वाळल्यानंतर कणसे बडवून मळणी करावी. धान्य उन्हात चांगले वाळवून हवेशीर जागी साठवण करुन ठेवावे.

वरई पीक हे लागवड करताना वापरण्यात येणाऱ्या सुधारित निविष्ठा व तंत्रज्ञानास उत्तम प्रतिसाद देणारे C4 वर्गातील पीक आहे. या पिकापासून सरासरी हेक्टरी १३ ते १५ क्विंटल प्रति हेक्टर धान्य उत्पादन घेता येते.

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved