शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आरटीई प्रवेश प्रक्रियेची सुरुवात: पालकांनी अर्ज करताना पाळावयाच्या सूचना
मुंबई: शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शिक्षण हक्क अधिनियम (RTE) अंतर्गत प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठी अर्ज प्रक्रिया १४ जानेवारी २०२५ पासून सुरू झाली आहे. पालकांना २७ जानेवारी २०२५ पर्यंत https://student.maharashtra.gov.in/adm_portal या अधिकृत पोर्टलवर अर्ज करता येईल.
आरटीई कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विना अनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वयंअर्थसहाय्यित) या शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकतात.
आरटीई अर्ज भरताना पालकांनी लक्षात ठेवावयाच्या महत्त्वाच्या सूचना:
१) अर्ज करण्यास सुरुवात: पालकांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आरटीई प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. अर्ज भरताना सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
२) निवासाचा पूर्ण पत्ता आणि लोकेशन तपासा: अर्जात दिलेला Google Location आणि निवासाचा पूर्ण पत्ता काळजीपूर्वक तपासावा. चुकीची माहिती भरल्यास प्रवेश प्रक्रिया रद्द होऊ शकते.
३) जन्मतारीख बदलता येणार नाही: अर्जात बालकाचा जन्मदाखल्यावरील जन्मदिनांक अचूक भरावा. एकदा सबमिट केलेली जन्मतारीख पुढे बदलता येणार नाही.
४) शाळांची निवड: पालकांनी १ किलोमीटर, १ ते ३ किलोमीटर पर्यंत अंतरावरील शाळा निवडताना कमाल १० शाळा निवडाव्यात.
५) कागदपत्रांची पूर्तता: अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. लॉटरी लागल्यानंतर कागदपत्रे अपूर्ण असल्यास प्रवेश रद्द केला जाऊ शकतो.
६) चुका सुधारण्याची सुविधा: अर्ज भरताना चूक झाली असल्यास, सर्व्हरवर सबमिट करण्यापूर्वी अर्ज डिलीट करून नवीन अर्ज भरावा.
७) डुप्लिकेट अर्ज टाळा: एका बालकासाठी फक्त एकच अर्ज भरावा. एकाच विद्यार्थ्याचे दोन अर्ज आढळल्यास दोन्ही अर्ज बाद केले जातील.
८) महत्त्वाची माहिती जतन करा: अर्ज क्रमांक, अर्जासाठी वापरलेला मोबाइल क्रमांक, आणि अर्जाची प्रत लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवा.
९) खोटी माहिती भरल्यास प्रवेश रद्द होईल: अर्जातील माहिती चुकीची असल्यास प्रवेश बाद होईल.
१०) पासवर्ड विसरल्यास पुनर्प्राप्ती सुविधा: पासवर्ड विसरल्यास ‘Recover Password’ पर्यायावर क्लिक करून पासवर्ड रिसेट करा.
११) अर्जाची अंतिम मुदत: २७ जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येईल. मुदत संपल्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
१२) दिव्यांग बालकांसाठी प्रमाणपत्राची अट: दिव्यांग विद्यार्थ्यांना अर्ज करताना ४०% किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणाचा दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक आहे.
१३) निवासी पुराव्यासाठी बदल: यंदा गॅस बुकिंगचा पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही.
१४) बँकेचे पासबुक: निवासी पुराव्यासाठी फक्त राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक मान्य केले जाईल.
१५) लोकेशनसाठी Google Map वापरा: अर्ज करताना Google Map वर पत्ता शोधून त्याचे Latitude आणि Longitude अचूकपणे भरा, जेणेकरून लोकेशन चुकणार नाही.
पालकांसाठी अंतिम सूचना:
आरटीईच्या शिक्षणाच्या समान संधी निर्माण करणाऱ्या या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सर्व पात्र पालकांनी वेळेत अर्ज करावा. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत लक्ष दिल्यास आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवल्यास प्रवेशाची संधी नक्कीच मिळू शकते.