खाशाबा जाधव
खाशाबा हे एकमेव भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते आहेत, ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला नाही. खाशाबा पायाने अत्यंत चपळ होते, ज्यामुळे ते त्यांच्या काळातील इतर पैलवानांपेक्षा वेगळे होते. इंग्लिश प्रशिक्षक रीस गार्डनर यांनी त्यांच्यामध्ये हे वैशिष्ट्य पाहिले आणि १९४८ च्या ऑलिम्पिक खेळांपूर्वी त्यांना प्रशिक्षण दिले.
खाशाबा जाधवांनी इ.स. १९४८ सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. इ.स. १९५२ सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.
२००० मध्ये, भारत सरकारने खाशाबा यांना कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. २०१० च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससाठी नव्याने बांधलेल्या कुस्ती स्थळाला त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांचे नाव देण्यात आले. १५ जानेवारी २०२३ रोजी, गूगलने खाशाबा जाधव यांना त्यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त गूगल डूडलद्वारे सन्मानित केले.