सातारा जिल्ह्यात ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सातारा जिल्ह्यात ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 

‘स्मार्ट पीएचसी’ चा सातारा पॅटर्न राज्यभर राबविणार – मुख्यमंत्री

 

राज्यातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज करण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘स्मार्ट पीएचसी’चा सातारा पॅटर्न राज्यभर राबविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी केले.

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याहस्ते जिल्ह्यातील ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा (स्मार्ट पीएचसी) व अन्य उपक्रमांचा ई- शुभारंभ, ई- भूमिपूजन, लोकार्पण श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

राज्य शासनाचे शिक्षण आणि आरोग्याला महत्व दिलेले आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले. राज्य शासनाने २०३५ चे व्हिजन तयार केले आहे. त्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत अनेक निर्णय घेतले. वैद्यकीय महाविद्यालयांना जोडलेली जिल्हा रुग्णालये परत मिळण्यात अनेक वर्षे जातात, म्हणून पर्यायी यंत्रणा उभी राहावी यासाठी निर्णय घेतले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दीड लाख रुपयांची मर्यादा पाच लाख रुपयांवर नेण्याचा निर्णय व त्याचा सर्वांना लाभ, आरोग्य विभागामार्फत महिला व बालकांची आरोग्य तपासणी, शासकीय रुग्णालयात कॅशलेस सेवा देण्याचा निर्णय राबविण्यात येत आहे. गेल्या दीड वर्षात सुमारे १५० कोटी रुपयांहून अधिकचा मुख्यमंत्री सहायता निधी लोकांना दिला, असेही ते म्हणाले.

 

‘स्मार्ट पीएचसी’ अंतर्गत दवाखान्यात देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा निरंतरपणे मिळत राहाव्यात. त्यासाठी देखभाल दुरुस्तीच्या अनुषंगाने आवश्यक निधीची तरतूद जिल्हा वार्षिक योजनेतून  करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

‘शासन आपल्या दारी’ प्रमाणे ‘आरोग्य आपल्या दारी’

 

शासन आपल्या दारी उपक्रमाचा राज्यातील २ कोटी लोकांना लाभ मिळाला. त्याचप्रमाणे आरोग्य आपल्या दारी ही देखील आपली संकल्पना आहे, असेही ते म्हणाले. खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा भविष्यात शासकीय रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळाव्या यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यभरात स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. त्याचा अधिक विस्तार करून नव्याने असे ७०० दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात २० ठिकाणी हा दवाखाना सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले.

 

स्थानिकाला येथेच रोजगार

 

सातारा जिल्ह्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. येथील माणूस कामाच्या शोधात बाहेर जाऊ नये व त्याला इथेच रोजगार मिळावा यासाठी पर्यटनाला मोठी चालना मिळावी म्हणून प्रयत्नशील आहे. येथील शेतकरीदेखील आधुनिक पद्धतीने शेती करत असतात. यापुढील काळात नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, असेही श्री. शिंदे म्हणाले. महिला सक्षमीकरण, बचत गटांना अर्थसहाय्य इतकेच मर्यादित न राहता त्यांच्या उत्पादनांचे ब्रॅण्डिंग, पॅकेजिंग, मार्केटिंग यासाठी सामूहिक संसाधन केंद्रांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. राज्यात ‘मॉडेल स्कूल’ तयार करून उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

 

स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे

 

कार्यक्रमात ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा शुभारंभ, ५२ कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येणाऱ्या फलटण तालुक्यातील पवारवाडी, सातारा तालुक्यातील निनाम, कोरेगाव तालुक्यातील एकंबे आणि पाटण तालुक्यातील मारुल हवेली या ४ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे ई-भुमिपूजन, नविन प्राथमिक आरोग्य केंद्र ताथवडा, गुरसाळे, क्षेत्र माहुली, अंगापूर व येळगाव या ठिकाणी देण्यात येणाऱ्या ६ रुग्णवाहिकांचे लोकार्पण तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राना आयआय केअर फाउंडेशन यांनी सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधी अंतर्गत दिलेल्या १२५ संगणकाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved