Home / इतर / सरसेनापती उमाबाई दाभाडे

सरसेनापती उमाबाई दाभाडे

सन्मान कर्तृत्वाचा जागर स्त्री शक्तीचा या पर्व मध्ये आजचा पाचवा दिवस ह्या नवरात्री च्या पाचव्या दिवशी आपण आज सरसेनापती उमाबाई दाभाडे, यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत.

सरसेनापती उमाबाई दाभाडे

सरसेनापती उमाबाई दाभाडे  जन्मची तारीख इतिहासात उपलब्ध नाही.  उमाबाई ह्या अभोणकर देवराव ठोके देशमुखांची कन्या होत्या. व तळेगाव दाभाड्याचे खंडेराव दाभाडे हे त्यांचे पती हे त्यांचे पती होते. खंडेराव दाभाडे यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. शाहू महाराजांनी 1717 मध्ये खंडेराव दाभाडे यांना सेनापतीपदी नेमले. एका शिलालेखात खंडेराव दाभाडे यांचा पुढीलप्रमाणे उल्लेख आहे, नुसते सेनापती म्हटले म्हणजे खंडेराव दाभाडे हे नाव घेतल्याचा कार्यभाग होतो. अशा शूर सेनापतीची पत्नी म्हणून उमाबाईंनी खर्‍या अर्थाने पुढे आपली भूमिका सार्थ केली. मराठी साम्राज्यातील पहिली सरसेनापती म्हणून उमाबाई दाभाडे यांना ओळखले जाते. दाभाडे यांचे घराणे शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठ्यांच्या सैन्यात होते. पुण्याजवळचे तळेगाव दाभाडे हे त्यांचे वतनाचे गाव असून तेथेच दाभाडे कुटुंब राहत होते.

1729 मध्ये खंडेराव दाभाडे यांचे निधन झाले. उमाबाईंचे ज्येष्ठ पुत्र त्रिंबकराव दाभाडे यांना शाहू महाराजांनी गुजरातच्या मुलुखगिरीची व बाजीराव पेशवे यांना माळव्याच्या मुलखगिरीची जबाबदारी दिली. परंतु पुढे पेशवे व त्रिंबकराव यांच्यामधील वादामुळे 1731 च्या डभईच्या लढाईत त्रिंबकराव मारले गेले. पुत्राच्या मृत्यूमुळे उमाबाई बाजीराव पेशवे यांच्यावर अतिशय संतप्त झाल्या. त्यावेळी खुद्द शाहू महाराजांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. बाजीरावांना उमाबाईंची माफी मागायला लावून हा वाद शांत केला. पती आणि ज्येष्ठ मुलाच्या निधनाने आणि बाकी मुले लहान असल्याने वतनाची जबाबदारी उमाबाईंच्या अंगावर पडली व ती त्यांनी समर्थपणे पेलली. उमाबाईंनी अत्यंत कठीण अशा सेनापतीपदाची जबाबदारी वीस वर्षे निभावली. राजकारण करण्याबरोबरच प्रत्यक्ष युद्धभूमीवरही त्या लढल्या. एका महिलेला अबला समजून चहुबाजूंनी संकटांनी घेरले. तरी उमाबाई दाभाडे यांचे धैर्य, शौर्य, आत्मविश्वास आणि करारी स्वभाव त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा परिचय देतात. जबरदस्त ताकदीचा मुत्सद्दीपणा त्यांच्याकडे होता.

१७३२ साली अहमदाबादवर जोरावर खान नावाचा मुघल सरदार चालून आला. त्याच्या पारिपत्याची जबाबदारी श्रीमंत उमाबाई साहेब यांच्यावर देण्यात आली. सरसेनापती उमाबाई या आपल्यावर चालून आलेल पाहून जोरावर खानानं त्यांना पत्र लिहिलं, हे पत्र वाचून उमाबाईंनी ठरविले की  जोरावरखानाला उत्तर लढाईतच द्यायचे. अहमदाबादच्या किल्याबाहेरच युद्ध सुरू झाले.पांढरा शुभ्र पेहराव परिधान केलेल्या उमाबाई प्रचंड सैन्याच्या गदारोळात रणांगणाच्या मध्यभागी हत्तीवर बसून लढत होत्या. जोरावरखानाच्या प्रचंड सैन्याचा मावळ्यांच्या सहकार्यांने त्यांनी पराभव केला .

उमाबाईच्या मराठा सैन्याचा आवेश बघून जोरावरखान किल्याच्या आत जाऊन लपून बसला. किल्याचे दरवाजे आतून बंद केले. उमाबाईंना दरवाजाच्या आत शिरायचे कसे हा प्रश्न पडला. तेंव्हा शत्रूच्या सैन्यातील मृतदेहाचे ढीग दरवाजाला लावून , एकावरएक रचून पेटवून दिले.

दरवाजा पडला व मराठा सैन्य आत शिरले. जोरावरखानला जेरबंद करून साताऱ्यास आणले व त्या तळेगावी परतल्या.अहमदाबादेतील शौर्यावर खूश होऊन छत्रपती शाहू महाराज हे श्रीमंत उमाबाईंचा गौरव करण्यास तळेगावी आले. तळेगावात मोठा दरबार भरवण्यात आला.

सेनापती उमाबाई दाभाडे यांनी स्वतः मोहिमेत भाग घेऊन गुजरात सर केले. उमाबाईंच्या या शौर्यामुळे खूश होऊन छत्रपती शाहू महाराजांनी उमाबाई यांचा मोठा सन्मान करून पायात सोन्याचे तोडे घातले. सोन्याचे तोडे मिळवण्याचा मान उमाबाईंनंतर त्यांचा मुलगा यशवंतरावांनी सुरतेच्या लढाईत मिळवला. शाहू महाराजांच्या निधनानंतर सरदार दाभाडे यांचा मुख्य आधार कोसळला.

शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर परिस्थिती बरीच बदलली. बाजीराव पेशवे व त्रिंबकराव दाभाडे यांच्यापासून पेशवे व दाभाडे घराण्यात सुरू झालेले वैर कायम होते. नानासाहेब पेशवे सर्व कारभार बघत होते.सरदार मंडळी प्रबळ होऊन आपली सत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत होते. उमाबाई स्री आहे, त्यांचे काय चालणार, त्यांचे अधिकार कमी करून त्यांचा मुलुख कमी करण्याचा प्रयत्न अनेकजण पेशवाईत करत होते. उमाबाई आपला मुलुख कमी करून देण्यास तयार नव्हत्या.

उमाबाईंनी पेशव्यांसोबत बोलणी करण्यासाठी वकील पाठवला. पण उपयोग झाला नाही. स्वतः उमाबाईंनी आळंदी येथे पेशव्यांची भेट घेतली. त्या एकट्याच त्यांच्या बाजूने वाटाघाटी करण्यासाठी बसल्या. आपला मुलुख मोडून देण्याऐवजी आपल्याकडून पैसा घ्यावेत, असा विचार उमाबाईंनी नानासाहेबांसमोर ठामपणे मांडला. यावरून उमाबाई किती धाडसी होत्या हे दिसते. त्या धोरणी व हुशार होत्या याचा प्रत्यय राज्यकारभारतील अनेक घटनांमधील गोष्टीतून दिसून येतो.

२८ नोव्हेंबर १७५३ रोजी सरसेनापती उमाबाई दाभाडे वृद्धापकाळाने निधन झाले.

!! माहिती In मराठीकडून सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना मनाचा मुजरा !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!