शेतकऱ्याच्या चिकाटीचं फळ! 100 वर्ष जुन्या रक्तचंदनाच्या झाडासाठी रेल्वेने भरली 1 कोटींची रक्कम

शेतकऱ्याच्या चिकाटीचं फळ! 100 वर्ष जुन्या रक्तचंदनाच्या झाडासाठी रेल्वेने भरली 1 कोटींची रक्कम

यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील एक रक्तचंदनाचं झाड वाचवण्यासाठी न्यायालयात लढा दिला आणि अखेर तो खटला जिंकला. या झाडाच्या मोबदल्यात रेल्वे प्रशासनाला तब्बल 1 कोटी रुपये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करावे लागले आहेत.

 

हा निर्णय 9 एप्रिल 2025 रोजी आला असून, न्यायालयाने संबंधित शेतकरी केशव शिंदे यांना यातील ५० लाख रुपये काढण्याची परवानगी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

केशव शिंदे यांची यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खरशी गावात 2.29 हेक्टर शेती आहे. या जमिनीमधून वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वेमार्ग गेला असून, त्यासाठी मध्य रेल्वेने ही जमीन संपादित केली होती. जमीन संपादनानंतर त्यांना जमिनीचा मोबदला मिळाला, पण शेतातील झाडांचा आणि पाईपलाईनसारख्या इतर गोष्टींचा मोबदला दिला गेला नव्हता.

 

या झाडांमध्ये एक 100 वर्ष जुनं रक्तचंदनाचं झाड होतं. यासोबतच येन, खैर आणि इतर आडजातीची झाडं, तसेच भूमिगत पाईपलाईनही होती. या सगळ्याचा मोबदला मिळावा यासाठी त्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती.

 

२०१४ पासून मागणी, अखेर न्यायालयात याचिका

केशव शिंदे यांचे पुत्र पंजाब शिंदे यांच्या सांगण्यानुसार, त्यांनी 2014 पासून जिल्हाधिकारी, वनविभाग, रेल्वे आणि सिंचन विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार केला. मात्र, मोबदल्यासंदर्भात कोणतीही सकारात्मक कृती झाली नाही.

 

अखेर, 2024 मध्ये म्हणजे तब्बल आठ वर्षांनंतर, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. केवळ एका वर्षातच त्यांनी हा खटला जिंकला.

 

मोबदला अजून वाढू शकतो?

याचिकाकर्त्यांचे वकील अंजना राऊत नरवडे यांनी सांगितलं की, अद्याप रक्तचंदनाच्या झाडाचं अंतिम मूल्यांकन झालेलं नाही. सध्या हायकोर्टाच्या आदेशानुसार रेल्वेने 1 कोटी रुपये जमा केले आहेत, पण मूल्यांकनानंतर ही रक्कम जवळपास 5 कोटींपर्यंत जाऊ शकते.

 

त्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची आणि इतर तज्ज्ञांची समिती नेमली जाणार आहे. ही समिती झाडाचं योग्य मूल्यांकन करून अंतिम मोबदला ठरवणार आहे.

रेल्वेची बाजू काय?

या प्रकरणात रेल्वेचे वकील निरजा चौबे यांनी सांगितलं की, मूल्यांकन न झाल्यामुळेच मोबदला दिला गेला नव्हता. “झाड उभं असताना त्याचं मूल्य कसं ठरवायचं याबाबतही संभ्रम होता. त्यामुळे आम्ही मोबदला रोखून ठेवला होता. मात्र, हायकोर्टाच्या आदेशानंतर 1 कोटी रुपये जमा करण्यात आले,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

खासगी मूल्यांकन आणि व्याजाची मागणी

शिंदे कुटुंबाने आंध्र प्रदेशातून रक्तचंदनाच्या दरांची माहिती मिळवली आणि खासगी अभियांत्रिकी तज्ज्ञाकडून मूल्यांकन करून 4 कोटी 94 लाख रुपयांचा आकडा मांडला आहे. तसेच, संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यासोबतच झाडांचा मोबदला मिळण्याच्या कालावधीपासून व्याज मिळावं, अशीही त्यांची मागणी आहे.

अजूनही काही बाबी प्रलंबित

शेतातील अन्य झाडं आणि भूमिगत पाईपलाईनचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. या मुद्द्यावरही न्यायालयात सुनावणी होणार असून, यासाठी शिंदे कुटुंबियांनी पुढील कार्यवाही सुरू ठेवली आहे.

 

ही केस महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या चळवळीचा एक ठळक उदाहरण ठरली आहे. एका झाडासाठी इतकी मोठी रक्कम मिळवणं हे दुर्मिळ असून, यामागे शेतकऱ्यांच्या चिकाटीची, कायदेशीर लढाईची आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी असलेल्या जाणिवेची साक्ष मिळते.

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved