Home / गुंतवणूक (Investment) / वॉरेन बफे सोन्यात गुंतवणूक का करत नाहीत? | सोनं vs शेअर मार्केट गुंतवणूक रणनीती

वॉरेन बफे सोन्यात गुंतवणूक का करत नाहीत? | सोनं vs शेअर मार्केट गुंतवणूक रणनीती

resized image 200x200 2
वॉरेन बफे सोन्यात गुंतवणूक का करत नाहीत? | सोनं vs शेअर मार्केट गुंतवणूक रणनीती

 

शेअर बाजारातील बादशाह वॉरेन बफे कधीच सोन्यात गुंतवणूक करत नाहीत, का? सोनं आणि शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या धोरणांचा सखोल अभ्यास करा आणि जाणून घ्या कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे.

सध्या सोन्याच्या दरात होत असलेल्या सातत्यपूर्ण वाढीमुळे सर्वसामान्यांपासून ते प्रोफेशनल इन्व्हेस्टर्सपर्यंत सगळ्यांचेच लक्ष सोन्यावर केंद्रित झालं आहे. गेल्या काही महिन्यांत सोन्याने विक्रमी पातळी गाठली आहे. भारतात सोनं प्रति 10 ग्रॅम 90 हजार रुपयांपर्यंत पोहोचलं असून, चांदीनेही किलोमागे 1.05 लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे.

 

या भाववाढीमुळे अनेकांमध्ये FOMO म्हणजे ‘फियर ऑफ मिसिंग आऊट’ निर्माण झाला आहे—”सोनं घ्यायचंच” अशी आतुरता. कारण, गेल्या काही वर्षांत सोन्याने जवळपास दुप्पट रिटर्न दिले आहेत.

 

पण या सगळ्या धावपळीत एक गोष्ट लक्ष वेधून घेते — ज्याला शेअर मार्केटचा बादशाह समजलं जातं, त्या वॉरेन बफेने कधीच सोन्यात गुंतवणूक केली नाही. हे खरं आहे!

 

पण वॉरेन बफे सोन्यात गुंतवणूक का करत नाही?

वॉरेन बफे हे जगातील सर्वात यशस्वी इन्व्हेस्टर्सपैकी एक आहेत. त्यांच्या ‘बर्कशायर हॅथवे’ या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र, सोन्याबद्दल त्यांचे मत स्पष्ट आहे — “सोनं उपयोगी नाही, ना ते काही उत्पन्न निर्माण करतं.”

 

२०११ मध्ये त्यांनी आपल्या शेअरहोल्डर्सना लिहिलेल्या पत्रात सांगितलं होतं की सोनं ही एक ‘निष्क्रिय मालमत्ता’ आहे. त्यांचं मत असं आहे की सोन्याचा एक अंश १०० वर्षांनीसुद्धा तितकाच राहतो — त्यात कोणतीही वाढ किंवा मूल्यनिर्मिती होत नाही.

 

त्यांच्या मते, गुंतवणूक ही अशी गोष्ट असावी जी तुम्हाला उत्पन्न देते, उदाहरणार्थ शेअर्स, जे नफा निर्माण करतात, डिव्हिडंड देतात आणि वाढीस लागतात. उलट सोनं फक्त ‘तिथे आहे’, पण काही करत नाही. त्यांनी एका मुलाखतीत अगदी गंमतीत सांगितलं होतं, “सोन्याकडे फक्त बघत राहा, त्याच्याशी बोलाल… पण ते उत्तर देणार नाही!”

२०२० मध्ये वॉरेन बफेने सोन्याशी संबंधित गुंतवणूक का केली?

कोविड काळात २०२० मध्ये बफे यांनी ‘बॅरिक गोल्ड’ नावाच्या सोनं उत्पादन करणाऱ्या कंपनीत थोडी गुंतवणूक केली होती. त्यामुळे लोकांना वाटलं की ते आता सोन्यात विश्वास ठेवत आहेत. पण सहा महिन्यांतच त्यांनी ती गुंतवणूक परत घेतली. कारण त्यांना सोनं नको होतं, त्यांना हवी होती ती एक उत्पन्न देणारी कंपनी!

 

मग सोनं की शेअर मार्केट?

गेल्या दोन वर्षांत सोनं झपाट्याने वाढलं आहे, हे खरं आहे. जगभरात वाढलेले भूराजकीय तणाव, डॉलरवरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न, आणि जागतिक मंदीची भीती यामुळे सेंट्रल बँका, विशेषतः चीनसारखे देश, मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत आहेत. भारतातही लोक शेअर बाजारातील अस्थिरतेपासून वाचण्यासाठी सोन्याकडे वळत आहेत.

 

तरीही वॉरेन बफे यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांना वाटतं की संकटाच्या काळातसुद्धा सोनं केवळ सुरक्षित वाटतं, पण त्यातून काही आर्थिक फायद्याची अपेक्षा करता येत नाही. त्याऐवजी ते कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देतात — कारण कंपन्या नफा कमवतात, वाढतात आणि मूल्यनिर्मिती करतात.

 

निष्कर्ष

सोनं असो किंवा शेअर्स, प्रत्येक मालमत्तेचं स्वतःचं महत्त्व आणि मर्यादा असतात. सोनं आपल्याला सुरक्षिततेची आणि भावनिक आधाराची भावना देते, तर शेअर मार्केट वाढीची आणि नफा मिळवण्याची संधी देते.

 

वॉरेन बफे यांचं म्हणणं स्पष्ट आहे — “दीर्घकालीन गुंतवणूक हवी असेल, तर उत्पन्न देणाऱ्या, वाढणाऱ्या व्यवसायांमध्ये पैसा लावा.”

 

पण शेवटी महत्त्वाचं म्हणजे — तुमचं गुंतवणुकीचं धोरण हे तुमच्या गरजा, उद्दिष्टं आणि धोका पेलण्याच्या क्षमतेनुसार ठरलं पाहिजे.

 

जर तुमचं ध्येय सुरक्षितता असेल तर सोनं एक पर्याय आहे. पण वाढ, उत्पन्न आणि मूल्यनिर्मिती पाहिजे असेल, तर शेअर मार्केटमध्ये शहाणपणाने गुंतवणूक करा.

 

स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करा आणि ‘पैसा पाणी’सोबतच तुमचं आर्थिक भविष्य उजळवा!

Tagged:

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Social Icons

error: Content is protected !!