एसटी होणार आता पर्यावरणपूरक – पाच हजार एसटी बस डिझेलऐवजी एलएनजीवर धावणार
राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
एलएनजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये सुमारे १०% घट होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर महामंडळाचे दरवर्षी २३४ कोटी रुपये पर्यंतच्या आसपास बचत होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा मिळणार.
एकूण ५००० डिझेल वाहनांचे एलएनजी वाहनांमध्ये रुपांतरण हे तीन वर्षामध्ये टप्याटप्याने करण्यात येणार आहे. ऐकून ६ टप्यात संपूर्ण पाच हजार बसेसचे रुपांतरण करण्यात येणार आहे तसेच राज्यातील ९० आगारांमध्ये एलएनजी इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे डिझेल इंधनावर चालणारी सुमारे १६ हजार प्रवाशी वाहने आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४% खर्च डिझेलवर केला जातो. हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरण्यासाठी उद्योग विभागाने महाराष्ट्रासाठी एलएनजी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी किंग्स् गॅस प्रा.लि. यांचेबरोबर सामंजस्य करार केला आहे. त्यामध्ये परिवहनासाठी एलएनजीचा वापर व पुरवठा याचा समावेश करण्यात आला आहे. रुपांतरीत झालेल्या वाहनांची देखभाल ही रुपांतरण केलेल्या कंपनी मार्फत करण्यात येणार असुन त्याचा देखभालीचा खर्च महामंडळातर्फे करण्यात येणार आहे.